Saturday 16 May 2020

                                                               “मराठी असे आमुची मायबोली.
                                                                         जरी आज ती राजभाषा
      तिचे पुत्र आम्ही तिचे पांग फेडू ,            
     तिला बैसवू वैभवाच्या शिरी”
                   कविवर्य कुसुमाग्रज यांच्या  जन्मदिनी आपण आपल्या मायबोलीचा महिमा विविध अशा माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतो. मातृभाषेच्या  मागूनच संस्कृतीची सावली  फिरत असते. लहान मूल जेव्हा शाळेत येतं  तेव्हा भाषेच्या भांड्यातूनच ती आपली सारी संस्कृती घेवून येतं.ज्याप्रमाणे  घराला प्रकाशयोजनेसाठी आपण  दोन-चार खिडeक्या बसवतो.त्याचा आकार भलेही दरवाज्यापेक्षा मोठा असेल,तरीही घरातून बाहेर किंवा बाहेरून आत ये-जा करण्यासाठी जसा दरवाजाच योग्य असतो.आपण खिडकीतून कधीही  ये-जा करत नाही,त्यातून बाहेरचे जग न्याहाळू शकतो; त्याप्रमाणे  मातृभाषा ही याअर्थाने अतिशय महत्वाची आहे. कारण विचार करण्याची प्रक्रिया  मातृभाषेतूनच होत असते.अशावेळी मुलाच्या स्वभाषेला दूर सारणे म्हणजे ज्ञानाचा आधारच नष्ट करण्यासारखे आहे.स्वभाषेला जर योग्य प्रोत्साहन दिले तरच  मुलांना आपण बहुभाषिकत्वाकडे वळवून त्याना जागतिकीकरणाच्या दृष्टीने सक्षम बनविने शक्य होईल.यापध्दतीने काम करणाऱ्या शाळांची गरज आज आपल्या समाजाला आहे. किंबहुना, भाषा हा केवळ एक विषय म्हणूनच शिकवणा-या शाळांनी हा उद्देश कदापिही साध्य होणार नाही. पण बदलत्या  जागतिकीकरणाच्या ब-यावाईट परिणामांपैकीच एक म्हणजे इंग्रजी माध्यमांच्य़ा शाळांमध्ये होणारी वाढ याबरोबरंच मराठी शाळांची किंवा प्रादेशिक भाषेतील शाळांचा  दिवसेंदिवस घसरत  असलेला आलेख हा निश्चितच याविषयी अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न आहे.काही ठिकाणी तर केवळ नोकरीसाठी किंवा आपण ठराविक माध्यमातून  शिकल्यावरच आपल्याला रोजगार मिळेल या अनाठायी भितीमुळे  आपल्याकडील पालकांचा ओढा मराठीऐवजी इतर भाषेकडे आहे.आणि ते मुळातच अवैज्ञानिक आहे.ज्यातून आपण आपल्या पाल्यांना एका अज्ञानाच्या कडेलोटाकडे घेवून जात असल्याचे चित्र दिसत आहे.त्यासाठी परवा मला एक  आलेला अनुभव मला याठिकाणी सांगावा लागेल आमच्या एका शिक्षकभगिणीच्या कन्या दहावीत असल्याने त्यांना त्यावेळी इंग्रजी माध्यमात(केवळ वडिलांच्या मर्जीने) घातलेलं होत.आज दहावीची परीक्षाही अर्थातच इंग्रजीतूनच द्यायची असल्याने सातत्याने तिच्यावर इतर विषयाच्या सरावाचा भडीमार केला जातो. पण ज्या शाळेत ती मुलगी शिकले तिथे आजवर फक्त नि फक्तच इंग्रजीच शिकवण्यावर भर दिल्यामुळे इतर विषयाचे मुलभूत ज्ञान तिला देण्यात शाळा असमर्थ ठरली . आज इतर विषय समजून घेतांना तिला प्रचंड तणावाखालून जावं लागतंय यामुळे तीला शिकण्याचाच प्रचंड कंटाळा येवून ती आता एका विचित्र माणसिकतेतून असल्याचे दिसून येते आणि याहून गंभीर म्हणजे तिच्याऐवजी पालकांनांच तिचा अभ्यास करण्यापलीकडे आता दुसरा पर्यायंच उरलेला नाही.यामुळे असं स्पष्ट होतं की केवळ एका भाषेसाठी ज्ञानाचा बळी याठिकाणी दिलेला आहे. थोडक्यात ‘गुड आणि ‘बॅड’ शिकवण्याच्या ओघात  मुलाची नैसर्गिक अभिव्यक्तीची, ज्ञानाची  भाषा  बोलणेही ‘बॅड’ ठरवण्याचा धोका इथे वारंवार अनुभवायला मिळतो.


 

                  दोन किंवा त्याहून अधिक भाषा सहजतेने वापरता येणे ही उद्याच्या पिढीची गरज आहे.जागतिकीकरणाच्या काळात अनेक भाषिकसंस्कृती निकट येत असल्यामुळे  या भाषा संपर्कभाषा म्हणून त्यांचा विकास झाला पाहिजे.त्याच्यामध्ये मराठी शाळांची भूमिका अतिशय निर्णायक आहे. थोडक्यात आपल्या समाजाविषयी सांगायचे झाल्यास मराठी,इंग्रजी या किंवा इतर अन्य भाषा यायला हव्यात. लहान वयातच मुले विनासायास भाषा शिकतात.पण या मध्ये भाषा ‘आत्मसात करणं’ आणि भाषा ‘शिकणं’ या दोन भिन्न प्रक्रिया आहेत .पहिली भाषा मूल आत्मसात करते किंवा परिसरात जेवढ्या भाषा असतात त्या मूल ‘आत्मसात’ करते त्या व्यतिरिक्त इतर  भाषा फक्त ‘शिकण्या’च्या प्रकारात मोडतात.उदा-आई-वडिल द्विभाषीक असतील तर मूल सहज ती भाषा शिकते किंवा त्याच्या नित्यसंपर्कात येणारी भाषा आत्मसात करते. त्यामुळे मराठी भाषक मुलाला ,सर्वतोपरी केवळ जर इंग्रजीवरच भर दिला  किंवा मराठी ही दुय्यम दर्जाची भाषा आहे म्हणून तिचा वापरच टाळण्याचा प्रयत्न केला तर मुलाची पहिली भाषा बोलण्याची क्षमता हळूहळू नष्ट होते.असाच अनुभव आजवर  इंग्रजी माध्यमाच्या शाळा मधून  येताना दिसतो. इंग्रजी माध्यमाचे वाढते वेड हे प्रामुख्याने एकाच कारणामुळे आहे. ते म्हणजे मराठी माध्यमात अनेक  वर्षे शिकूनही इंग्रजी येत नाही .त्यासाठी मराठी शाळा, उत्तम मराठी याबरोबरंच मराठीतून उत्तम ज्ञानप्राप्ती तसेच उत्तम इंग्रजी देण्याची तयारी ठेवत  असतील तर पालक मराठी शाळांकडे पाठ फिरवणार नाहीत. शालांत परीक्षेबरोबरंच जर मुलांना ब-यापैकी इंग्रजी येत असेल तर! किंवा स्वभाषेतून (मराठीतून)  ज्ञानप्राप्तीचे काम कितीतरी पटीने चांगले होते , ही नैसर्गिक घटना पालकांच्या लक्षात आली तर मराठी माध्यमाविषयी शंका घेण्याचे कारणच उरणार नाही.आज आपल्यातील काही शांळांमधील मुले मराठीसोबत इंग्रजीतही अत्यंत सरस आहेत हे आता तेथल्या पालकांनी मान्य करून गावातील शाळेच्या विकासासाठी शर्थीने प्रयत्न करत खऱ्या अर्थाने मराठी जगवण्याचा  इतर भाषा शिकण्यासाठी पोषक वतावरण निर्माण करत एक आदर्श परिपाठ घालून दिलेला आहे.

                  एक पालक म्हणून  आपण अशी समजूत करून घेतली आहे की, स्पर्धा आणि इंग्रजीचा  फार घनिष्ट संबंध आहे.म्हणजेच स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजी शिका आणि  मग त्यासाठी इंग्रजी शाळेतच गेले पाहिजे असा गैरसमजही आहे. वास्तविक स्पर्धेत टिकून रहाण्याचा  संबंध ‘शिक्षणाशी’ , त्याच्य़ा दर्जाशी  किंवा  त्या शिक्षणाने प्राप्त अशी जी ‘ ज्ञानात्मक ताकद’ आहे तिच्याशी येतो.इथे भाषिक माध्यम हे कधीही दुय्यमच आहे. शाळा मुलाला प्रामुख्यानं काय देते, विद्यार्थांची पुरेशी ज्ञानप्रातीची खात्री झाले का? मुलाला स्वताच्या क्षमता व कमकुवत बाजू समजल्या आहेत का? स्वतंत्रपणे विचार करून ,अभिव्यक्तीचे सामर्थ्य आले आहे काय? त्यांना स्वताचे नागरिकत्व नि समाजभान कितपत आले आहे. या सार्या गोष्टी शिक्षणाने मिळतात. याउलट भाषिक माध्यम बदलल्याने मिळत नाहीत; किंवा  इंग्रजी माध्यम  व शिक्षण यांचा सरळ संबंध नसताना  केवळ इंग्रजी माध्यमाच्या हव्यासाने आपण काहीतरी भारी  मिळवण्याच्या नादात काहीतरी चांगले गमावणार तर नाही ना? अशा संदिग्ध परिस्थितीत  पालकांनी ‘शिक्षण’ की ‘माध्यम’ या दोन्हीपैकी कशाची निवड करायची हे आता एकदा तपासून बघीतलेच पाहिजे.याचे  दुसरे कारण असेही आहे की सर्वसाधारणपणे  इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून मुलाच्या स्वभाषा समृद्घीकडे कानाडोळा केला जातो. शिवाय मुलाची ‘ज्ञानभाषा’च पुसून टाकण्याचा प्रकार इथे होतांना दिसतो. मुलांना त्यांच्या कल्पना लढविण्याच्या,स्वताचा शोध घेण्याची क्षमता असलेली   स्वताची भाषा मारून त्याजागी दुसरी भाषा  आणण्याचा अनाठायी प्रकार होताना दिसतो.कारण स्वभाषेची जागा दुसरी कोणतीही भाषा घेवू शकत नाही. याअनुषंगाने मराठी माध्यमाच्या शाळेचे स्थान (मराठी भाषकांसाठी) इंग्रजी वा अन्य माध्यमाची शाळा घेवूच शकत नाही. मुलांना  दर्जेदार शिक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे .असे आपण जर मानत असल्यास,  मराठी (स्वभाषा) मुलांचा हा हक्क इतर माध्यमातील शाळांमुळे डावलला जातो याबाबत कितीजण जागृत आहेत हा पुन्हा एक संशोधनाचा प्रश्न आहे.कारण मूल फक्त शाळेतच न शिकता परिसराचाही त्यावर प्रचंड पगडा असतो.अशा वेळी इंग्रजी माध्यमातील मुले आपल्या आई-वडिल व पालकांना पुरेसे इंग्रजी जर येत नसेल तर,त्यांच्यापासून दुरावतात.त्यांच्याशी संवाद साधण्यात त्यांना रस नसतो.किंवा त्याच्या त्या गल्लत भाषेमुळे(ना धड मराठी ना इंग्रजी) ते संपर्कहीन होतात.आई-वडिलही अशा  मुलांना  आपल्याशी, आपल्या भावभावनांशी,व कौटुंबिक संस्कृतीशी जूळवून घेवू शकत नाहीत. यातून इंग्रजीच्या नावाने चाललेल्या निव्वळ शिक्षणाच्या बाजारिकरणाचा मुद्दा अधोरेखित होताना दिसतो.

 

                  यास्वभाषेच्या दुर्लक्षांची परिणती  इथेच न थांबता पुढे गंभीर अशा परिणामात होते.उदा-मूळभाषेतील अभिव्यक्ती गमावून बसल्यामुळे,घरगुती बाबतीतही त्यांचा वापर नेमकेपणाने त्याना करता येत नाही.यांमुळे आई-वडिल व मुलांच्यात एकप्रकारची दरी वाढते व अंतीमतः त्याचा दोष मुलाच्या स्वभावाला दिला जातो. पण याचे खरे कारण, शाळांनी  जे मुलांना स्वताच्याभाषेपासून दूर ढकलले त्यात आहे हे आपण विसरतो.कारण स्वभाषा भावनिक सलगीची भाषा असते. कुटुंब हे  भावनिकतेच्या कसोटीवरच टिकलेले असल्याने स्वभाषेपासून तुटलेल्या व नंतर वाया गेलेल्या मुलांना आधी समजून घेण्यात केलेली गफलतीची जबर किंमत मोजणारे पालक आज आपण केलेल्या चुकीवर फारसे बोलत नसले तरी सत्य किंवा वास्तव वेगळेही करू शकत नाही.

 

                  अशा परिस्थितीत आज  आपल्या मराठी माध्यमाच्या शाळांसाठी आज पालक- शिक्षक व समाजाच्या सहभागातून  एक  प्रयोगशील चळवळ उभी  करण्याची गरज आहे कारण  मातृभाषेच्या शाळा या  गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नैसर्गिकदृष्ट्या सक्षम आहेत .ते ओळखून यथावकाशपणे प्रयोगशीलता आणल्यास किंवा शाळांमधून मराठी व इतर भाषा हा केवळ  एक क्रमीक विषय म्हणून, किंवा केवळ पाठामागील प्रश्नांसाठी भाषा न शिकवता त्याच्या उपयोगितेचे उद्दिष्ट पूर्ण झाले पाहिजे .  कारण  इतर विषयांचा ‘आशय’ शिकणे महत्वाचे असते तर भाषा ही भाषा म्हणूनच पाहणे व ती आत्मसात करण्यासाठी  वातावरणात पसरावी लागते त्यासाठी वातावरणनिर्मिती केल्यास   पहिल्या भाषेइतकीच दुसरीही भाषा आत्मसात होवू शकते.  यासाठी   शिक्षकांनी आपपल्या वर्गात विविध असे उपक्रम राबवून आपली शाळा  भाषा व इतर सामाजिक शास्त्रांकडे  जाणीवपूर्वक लक्ष देत त्याचे वेळोवेळी स्वयंमुल्यमापन करायची खरंच आज गरज आहे.यासाठी “बिल अँड बेल” या मनोवृत्ती सोडून ‘केवळ नोकरी’च  न करता आपल्या शाळांवरील सुलतानी व इतर भाषांचे संकट ओळखून आपण सजगपणे सतत कार्यान्वित असले पाहिजे याकामी लोकप्रतिधिंनीही आपल्या वैयक्तिक महत्वाकांक्षा नि विरोध बाजूला ठेवून  स्वभाषेच्या (मराठीच्या) शाळांचा विचार करणाऱ्या व्यक्ती अथवा संघटनांना बळ दिले पाहिजे.एकूणच य़ा शाळाना लोकाश्रयाबरोबरच राजाश्रय मिळवून देणे ही आपली  एक महत्वाची जबाबदारी आहे. आज बऱ्याच मातृभाषेतल्या शाळांमधील पालक,शिक्षक,माजी विद्यार्थी  नवनवे प्रयोग राबवत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळेच्यामागे ठामपणे उभे रहात आहेत ही  अत्यंत समाधानाची बाब आहे.त्यांच्या या कार्याची व्याप्ती मजलदरमजल वाढत रहाण्यासाठी आपण सजगपणे व आपल्या पाल्यांच्या उज्जल भविष्यासाठी उभे राहिले पाहिजे याच संदर्भातून आज सरकारच्या इंग्रजी शाळांच्या धोरणाचाही आपण पालक म्हणून सखोल विचार करायला हवा नाहीतर उजेडासाठी म्हणून घेतलेल्या दिव्याने स्वतःच्याच हाताने स्वताचे आख्खे घर पेटविल्याचा नंतर  पश्चाताप झाला तर नवल वाटायला नको.

                   जगाच्या पाठीवर पोलंड,रशिया, जपान, इटली, चीन, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, हॉलंड, कोरिया, बेल्जियम इत्यादी देशांत इंग्रजीचे अवास्तव स्तोम नाही. इंग्रजी भाषा शिकणे आणि इंग्रजीतून शिकणे यात आपण गल्लत करीत आहोत. धड ना त्यांना आपल्या भाषेचे ज्ञान, धड ना परक्या भाषेवर प्रभुत्व अशी या इंग्रजी शाळांतून शिकणाऱ्या मुलांची विचित्र अवस्था झाली आहे. अशा मुलांचे शिकण्याचे माध्यम इंग्रजी असल्यामुळे मराठी भाषा गौण ठरत आहे. अशांचा मराठी भाषेचा प्रभाव, भाषा सौंदर्य, वाङ्मय ग्रंथ निमिर्ती तसेच मराठी वाङ्मयाचे वाचक या बाबींशी दुरान्वये तरी संबंध येईल काय? वर्षातून एकदा 'मराठी राजभाषा दिन' साजरा करण्याने हा प्रश्न सुटणार नाही. मराठीचा ज्ञानभाषा म्हणून विकास साधण्यासाठी सध्या आपल्याकडे कोणताही उपक्रम नाही.त्यासाठी प्रत्येकाने मराठीतून बोललं पाहिजे,लिहितं झालं पाहिजे, मराठी भाषेची ज्ञानभाषा होवून तसेच तिची अर्थार्जनाशी सांगड घालायला हवी. त्यामुळे इतर भाषांना मिळालेली प्रतिष्ठा स्वभाषांनाही मिळण्यस नक्कीच मदत होईल.

            नुसतेच मराठीतून  छापलेले नि चौकाचौकैत उभारलेल्या प्लेक्सनी मराठी टिकेल असा कयास लावणं म्हणजे शुद्ध मुर्खपणाच ठरेल. ज्याचा यानात्यानात्याने ,प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मराठीशी संबंध येतो त्यानी  मराठी शाळां वाचवल्या नाहीत तर मराठीकरणाचा सर्व अट्टहास व्यर्थ ठरेल. कारण नुसतेच झेंडे फिरवून व फेटे बांधून मराठी जगवता येत नाही त्यासाठी मातृभाषेच्या शाळेच्या पातळीवर येवूनच तिच्या भल्याबुऱ्याचा सक्रीयतेने विचार करायला हवा त्यासाठी मराठी शाळा ही चळवळीच्या केद्रस्थांनी असणं हा समस्थ मराठीजनांसाठी मराठीकरणासाठी महत्वाचा दुवा ठरेल.
                                                                                                                
गोविंद तानाजी पाटील                                              
करंबळ
मो ८९७०७४२३०५

 


 

 

 

 


 
 

 

 


                                                           

No comments: