Saturday 16 May 2020

नामदेव माळी(ग.शि.मिरज) यांच्याशी ज्ञानरचनावाद व विद्यार्थीकेंद्रीत अध्ययन-अध्यापन यावर फोनवरून केलेली चर्चा

 

प्रश्न 1-पारंपारिक शिक्षणपद्धती आणि तुम्ही राबवत आलेल्या शिक्षणामध्ये काय फरक आह?

पारंपारिक शिक्षणामध्ये शिक्षकांला महत्व असतं . म्हणजेच शिकवण्याला महत्व असते. शिक्षक म्हणेल तसं शिक्षण असतं. आणि मी शिकवल्याशिवाय विद्यार्थी शिकू शकत नाही अशी भूमिका असते. पारंपारिक पद्धतीत शिकवलं जातं. तर ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीत शिकलं जातं. स्वतः शिकण्यासाठीच्या पूरक अनुभवाची रचना अथवा आवश्यक वातावरणाची रचना ज्ञानरचनावादात अपेक्षित आहे. इथे मूल ज्ञानरचनेच्या प्रक्रियेत सहभागी होवून  स्वतः नवीन गोष्टी नैसर्गिकपणे शिकतं किंवा नव्या ज्ञानाचा शोध घेतं.

प्रश्न - 2 ज्ञानरचनावादाचे मूळ, म्हणजे इतिहास काय आहे? /भारतात ही पध्दत प्रथम कुठे वापरली गेली?

भारताचं मी काही सांगू शकत नाही, पण भारतामध्ये म्हणाल तर आपल्याकडे महाराष्ट्रात रचनावाद आला तो गिजूभाई बधेका यांच्याकडून. परंतु याला त्यावेळी रचनावाद असे नाव नव्हते. आज रचनावादामध्ये ज्या गोष्टी प्रामुख्याने आहेत. जसे की, मुलांना महत्व, कृती करणं, शोध घेणं वगैरे बाबी या त्यांच्या पद्धतीतही होत्या. यासर्व गोष्टींचा उलगडा त्याच्या "दिवास्वप्न" या पुस्तकात त्यानी मांडला आहे. गिजूभाई बधेकानंतर महाराष्ट्रात परिसराचा अभ्यास करून परिसरातून शिक्षण देण्याचा प्रयत्न होवू लागला. कारण कधीही शाळेत न गेलेलादेखील त्याच्या आजूबाजूच्या परिसराच्या माध्यमातून खूप काही गोष्टी शिकत असतो. आणि अशा परिसरातून शिक्षण देण्याचं काम अनुताई वाघांनी सुरू केलं, नंतर महाराष्ट्रात ताराबाई मोडक, पुण्यातील रमेश पानसे व त्याच्या ग्राममंगल  संस्थेने शिवाय कोल्हापूरात 'लिला पाटलांच्या' सृजनानंद आदींनी या ज्ञानरचनावाद पद्धतीने शिकविण्याचा यशस्वीपणे प्रयत्न केला. मग साधारण २०१२ मध्ये सातारा येथे कुमठे बिटामध्ये. यापद्धतीने काम सुरू केलं. त्याच्या एकवर्षानंतर मिरज येथे मी व माझ्या शिक्षक सहकाऱ्यांनी काम करायला सुरवात केली. यापूर्वी हे काम एकाएका शाळेत किंवा संस्थेत होत होतं पण महाराष्ट्रात आता संपूर्ण  जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धतीने मोठ्या प्रमाणात काम चालू आहे.

 

प्रश्न - 3 या पद्धतीत अक्षर ओळख अंक ओळख कशी करून दिली जाते?

खरंतर आम्ही अक्षर शिकवतंच नाही. शब्द शिकतो नंतर अक्षराकडे येतो. सर्वप्रथम त्याला परिचित असलेली चित्र दाखवा. समजा चित्राच्या खाली'कोंबडा' असं लिहिलंय. आणि कोंबड्याला तुमच्या भाषेमध्ये 'कोंबा म्हणतात तसं मुल पहिल्यांदा कोंब असच म्हणेल. खेडयातलं एखादं मूल म्हशीला' म्हैस 'न म्हणता' म्हस 'असं म्हणेल. अशी अनेक चित्रं ते बघतं. त्याशिवाय ते म्हशीच्या चित्राबरोबर' म्हैस 'या अक्षराच्या चित्राला ई बघत अशाप्रकारे सरावाच्या कृतीनी ते अक्षर ओळख शिकतं.

                 त्याचप्रकारे केवळ अंक व पढ्यांची घोकंपट्टी करण्यापेक्षा प्रत्यक्ष वस्तू देवून त्याच्या अंकज्ञानाविषयीच्या संकल्पना स्पष्ट होतात. जसे की आपण समजा' चार 'असे लिहिले तर त्या लिखित चिन्हावर बरोबरच आपण. चार चेंडू, चार वांगी, चार खडू असा सराव घेतला तर अंकज्ञानाचे चांगल्या प्रकारे दृढीकरण होते. अशा अनेक सरावाच्या कृतीनी अंक व अक्षर ओळख करून दिली जाते.

👉👉प्रश्न - 4मुलांमध्ये भाषाविकास व्हावा किंवा वाचनाची गोडी वाढावी म्हणून कोणते उपक्रम राबवले जातात?

भाषाविकास म्हणजे मूल ऐकतं आणि बोलतं. भाषेच्या बाबतीत मुलाला भरपूर भरपूर ऐकण्याचा सराव दिला पाहिजे. तुम्ही जर त्याला एखादी भाषा शिकवत असाल तर त्या भाषेतले भरपूर शब्द त्याच्या कानावर पडले पाहिजे. तुम्ही जर इंग्रजी शिकवत असाल तर भरपूर शब्द त्यानं त्या भाषेतले ऐकले पाहिजेत. शाळेत न शिकताही काही मुलं परिसरातल्या इतर भाषाही बोलू लागतात. त्यांनी जरी ती भाषा लिहिता येत नसली तरी त्यांना ती भाषा बोलता येते.

        वाचनासाठी म्हणाल तर मुलांच्या आवडीनुसार, वयानुसार, भरपूर चित्र असलेली, मोठ्या अक्षराकाराची पुस्तके त्यांना हाताळायला दिली पाहिजे. वाचनासाठी आवड निर्माण करायला पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनी स्वतः वाचलं पाहिजेत.

👉👉प्रश्न-5 - वरच्या वर्गात (5ते 7वी) गणितासारखा विषय शिकवताना कोणत्या पध्दती वापरल्या जातात?

वेगळी कोणती पद्धत नाहीए. आणि पद्धती म्हणाल तर ती ज्ञानरचनावाद शिक्षणच आहे. जे म्हणून शिकवायचे आहे. ज्यातून नेमकं अपेक्षित काय आहे त्याचे अनुभव मुलांना देण्याचा किंवा ते त्याला पुरवले पाहिजेत. समजा तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं आहे, हे सूत्र सांगण्यापेक्षा त्याला कृती देऊनही शिकवता येतं. किंवा समजा तुम्हाला वर्तुळाचा परिघ मोजायचा आहे. परिघ किती हे मोजण्यासाठी वर्तुळाचा एखादा तुकडा द्या आणि मग क्षेत्रफळ मोजल्यास त्याचे अनुभव त्याला येतील. सरळकोण म्हणजे साधारण तीन कोणांची बेरीज असते. हे त्याला सांगण्यापेक्षा जर सरळकोणातील कोणाचे आकार कापून जर त्याला दिले तर मुलाला ते दिसतं आणि त्याचे अनुभव परिणामकारक होतात. असे वेगवेगळे प्रयोग आपण घेवू शकते. आणि ज्ञानरचनावादात शिक्षक स्वतःच्या संसाधन उपलब्धतेनुसार साहित्य घेवून अनुभव उभे करून मुलांकडून सराव घेतात.

👉👉प्रश्न - 6 वरच्या वर्गात (पाचवी ते सातवी) तंत्रज्ञान /संगणक साक्षरतेसाठी कोणत्याही उपक्रम राबविले जातात?

आता समजा तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. तुम्ही तो चालवायला शिकण्यासाठी तुम्ही  कुठले प्रशिक्षण घेतले होते बरे! तुमच्या हातात आहे म्हणून तो चालवायला येतो. त्यासाठी मुलांना या गोष्टी हाताळायला पुरेशा संधी आम्ही दिल्या पाहिजेत. नाहीतरी  हल्लीची मुले तंत्रज्ञानात बरीच पुढे आहेत. त्यासाठी थोडंसं याही  तंत्रज्ञानाचा परिचय होण्यासाठी मुलांना सराव करून घेण्यासाठी शाळेत ही साधने असणं महत्वाचे आहे.

👉👉प्रश्न - 7 या नव्या पद्धतीने शिकल्यावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन (परिक्षा) करतांना कोणकोणत्या  पद्धतींचा अवलंब केला जातो??

खरंतर या पद्धतीमध्ये मुलांना परिक्षा वाटेल अशी परिक्षा घ्यायची गरजच नाही. शिकवताना तुम्हाला कळतं की त्याला कळतं की, एखादी गोष्ट त्याला जमते की नाही. हे समजतंच. एखादं गणित त्याला कुठपर्यंत येतं किंवा तो काय समजून घेत नाही याची चाचपणी करण्यासाठी वेगवेगळ्या  चाचण्या आपण घेवू शकतो. वाचनात एखादा विद्यार्थी कुठपर्यंत आला आहे हे आपण वारंवार तपासून येवू  शकतो. एरवी मुलांच्या गुणावरून  आम्ही त्याचा दर्जा ठरवत असतो. पण इथे मात्र मुलांना एखादं कौशल्य येतं का? आणि ते पूर्णपणे अवगत झाले का? याची  खात्री करून घेण्यासाठी आपण सातत्यपूर्ण सर्वंकष असं मूल्यमापन करणं महत्वाचे आहे. समजा तुम्हाला ड्रायव्हींगमध्ये 50 गुण मिळाले तर ड्रायव्हिंग लायसन्स ध्यायचे का?? म्हणजे तुम्हाला ड्रायव्हिंग आली आलं आहे असा त्याचा अर्थ होतो का? त्याप्रमाणे  गणित अर्ध येत नाही ते पूर्णच यावं लागतं. काही  बाबी जमत नाहीत तेथे तपासणी व मार्गदर्शन  आवश्यक असतेच.

प्रश्न - 8. - जिल्हापरिषदांच्या शाळांमध्ये जिथे पारंपरिक पद्धतीनेच शिकवण्यावरच अजूनही भर दिला जातो. शिवाय शिक्षकांना बऱ्याचदा अशैक्षणिक कामे दिली जातात, अशा वातावरणात ज्ञानरचनावाद राबवताना शिक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद कसा असतो?

सर्वसाधारणपणे बरेच शिक्षक प्रयोगशील असतात काही बघून करणारे असतात. तर काहीजण करणारेच नसतात. कारण नवीन काही शिकण्यासाठी पहिलं किंवा जुनं सोडावं सोडावं लागतं. पण हे पहिलं सोडणं फार कठीण काम असतं. कोणतेही गोष्ट असो हे सर्वत्र लागू पडतं. एखादी नवीन गोष्ट शिकताना आपल्याला चुका होतातच. पण; त्यातली मजा यायला लागली. चांगल्या गोष्टी कळायला लागल्या की वाटतं हे नवीन चांगलं आहे.

 प्रश्न-9 -  एखादी शाळा द्नयानरचनावादी पद्धतीने चालवायची तर सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यात चांगला समन्वय असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या बाबत शाळेत टिमवर्क कसे काम करते?

      एखादी गोष्ट करायच तर लीडर खूप महत्त्वाचा असतो कारण तो सर्वना एकत्र करतो. टीमवर्क साठी मुख्याध्यापक महत्वाचा असतो कारण ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या त्या वेळी  त्या त्या गोष्टी त्यांच्या कडून करवून घ्यायला हव्यात. आपली ताकद काय आहे याचा शोध लागला पाहिजे. उदा. कपिल देव हा चांगली बोलिंग करतो, पण विरोधी संघाचे चांगली बॅटिंग करतात, तेव्हा आपण आपले क्षेत्ररक्षण उत्तम, केले पाहिजेत, हा उपयोग कप्तानाला योग्य प्रकारे करून घेता यायला हवा. नेमकी हीच भूमिका मुख्याध्यापकांची असते. हे एक उत्स्फूर्त काम असते वप्रत्येकजण त्यात सामावलेला आहे. टीमवर्क ने केलेले काम सदैव यशस्वीच होते.

प्रश्न - 10-पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी कोणते उपक्रम राबवले जातात? त्याला पालकांचा प्रतिसाद कसा असतो?

पालक  शाळेकडे येण्यापूर्वी शाळा पालकांकडे गेली पाहिजे. शाळेच्या काम  चांगलं असेल तर;पालक नक्कीच शाळेकडे येणार. तुमच्या शाळेविषयी त्यांना विश्वास वाटला पाहिजे. आणि मगच शिक्षक पालक संबंध सुधारतील जर अनुताई वाघांच्या शाळेत लोक आवडीनं जातात. नर्मदा खोर्‍यातल्या मेधा पाटकरांच्या शाळेत पालक जातात. तर, आपल्या शाळेत  का  येणार नाहीत?? शिक्षकांनी  त्यांना विश्वास दिला पाहिजे. शाळेत काय घडतं याची इत्थंभूत माहिती मूल घरात देत असतं. उदा.. आज कोणत्या गुरूजींच्या भांडण झालं. कोणत्या ताईंनी चॉकलेट दिलं. कुणी आज मारलं.... वगैरे सर्व गोष्टी  ते घरात सांगत असतं थोडक्यात मूल हे शाळेचं 'वर्तमानपत्र' असतं यासाठी शाळेतल्या वर्तनावर लक्ष दिलं की शिक्षक-पालक  संबध नक्कीच सुधारतील.

 प्रश्न-11तुमच्या शाळांमध्ये राबविले जाणारे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम कोणते?

उपक्रम भरपूर आहेत. तरीही दप्तराचं ओझं कढ मी करणे. शनिवारी दप्तराशिवाय शाळा भरविणे. विशिष्ट असे उपक्रम म्हणण्यापेक्षा सर्वच उपक्रम विशेष आहेत. मग ते विषयाधारीत किंवा  इतर सामान्य उपक्रम असतील.

प्रश्न 12. जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांची पटसंख्या साधारणपणे किती असते? जास्त पटसंख्या असलेल्या वर्गात शिक्षक वर्ग नियंत्रणासाठी कोणत्या कलृप्त्या अवलंबतो?

दहा, पंधरा ते वीस चाळीस पर्यंत असतो. मुले दंगा करतात कारण त्यांच्या बुद्धीला रोज काहितरी नवीन हवं असतं. त्यांना गुंतवणुकीसाठी काहितरी कृतियुक्त असे काम दिल्यास मग दंगा कमी होईल. म्हणजे ती व्यस्त असतात. त्यामुळे ती जरी तुम्ही Good morning म्हटलं तरी तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत. कारण त्यांचेकडे तुमच्याकडे बघायला वेळंच नसतो. पण आपण मात्र शिस्तीच्या नावाखाली त्यांना काही करूच देत नाही. 'हाताची घडी तोंडावर बोट' असे सांगून त्यांना शिकण्यापासून थांबवतो. मुलांचा शैक्षणिक गोंधळ असला की, मूल त्यातून शिकण्याचा गंध घेतं. आणि हीच खरी शिस्त.

प्रश्न 13पारंपरिक पद्धतीने शिक्षण घेतलेले विद्यार्थी आणि ज्ञानरचनावादी पद्धतीने शिक्षण घेतलेला विद्यार्थी यांच्या व्यक्तिमत्त्वांत काही ठळक फरक जाणवतो का?  कोणता?

सर्वसाधारणपणे पहिली व दुसरी करीता जास्त साहित्य लागते. हे साहित्य आपल्या आजूबाजूच्या परिसरात उपलब्ध साहित्यातून तयार करू शकतो. किंवा मिळवू शकतो. काहीवेळा शिक्षक स्वतः तयार करतात तर काहीवेळा शाळेच्या  अनुदानातून हे साहित्य तयार करू शकतात. आता बघा. म्हणजे आपल्याला जो पगार मिळतो तो घर चालवण्यासाठी नसतो तर शाळा व्यवस्थित चालवण्यासाठी असतो. आपल्या कामासाठी थोडा त्याग केला तर शाळेचा पर्यायाने आपलाच फायदा होतो.

प्रश्न 14 पारंपरिक पद्धतीने शिक्षण घेतलेले विद्यार्थी आणि ज्ञानरचनावादी पद्धतीने शिक्षण घेतलेला विद्यार्थी यांच्या व्यक्तिमत्त्वांत काही ठळक फरक जाणवतो का?  कोणता?

या पद्धतीतून शिकलेले विद्यार्थी आनंदीत असतात. शाळा सुटली तरी ते दंगा करत नाहीत. शाळा सुटली तरी त्याचा चेहरा प्रसन्न राहतो. ओरडून सांगत नाहीत.

प्रश्न - 15 - ज्ञानरचनावाद पद्धतीने शिकवताना शिक्षकांना सातत्याने क्रियाशील राहावे लागते, यासाठी शिक्षकांना कसे प्रवृत्त करता?

सुरवातीला जड जाते  कारण शिक्षकांना खूप जागरूकपणे काम करायचे नसते तर जागरूकतेनं काम करून घ्यायचं असतं. काय काय कामं करायची ते ठरवावं लागतं. यासाठी शिक्षकांनी कल्पना लढवून, साहित्य तयार करताना सुरवातीला अवघड वाटेल पण;जसजसे जमेल तशी शिक्षकही यात गोडी दाखवतात . त्यासाठी कार्यशाळा आयोजित करणं. चर्चा करणं, एकमेकांचे अनुभव एकमेकांना सांगणं. त्याना कोणत्या अडचणी आल्या याबाबत एखादे चर्चासत्र आयोजित केल्यानं खूप फायदा होईल. ज्ञानरचनावादात जशी मुलं गटात शिकतात तसं शिक्षकही एकमेकांना आणि त्यांचयाकार्यप्रणालीला समजून घेतील.

(सदर मुलाखत ही दोन वर्षा मागे खानापूर येथील कार्यशाळेच्या वेळी घेतली होती.)

गोविंद पाटील

8970742305